शब्द-शब्द

भोपाळात म्हैसूरचे जंगल ??

In Uncategorized on September 24, 2011 at 5:25 pm

टायगर पतौडींचे मागल्या आठवड्यात निधन झाले, त्यामुळे या रविवारच्या वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमध्ये त्यांच्यावर लेख येणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे लेख आले त्यातला हा एक लेख, भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी पतौडींच्या स्मृतींना दिलेला उजाळा

या लेखात छापल्या प्रमाणे भोपाळात म्हैसूरचे जंगल सापडल्यास कुणी जरा दाखवेल काय? महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता या वृत्तपत्रांमध्ये हल्ली मुद्रणदोष, संदर्भ व्यवस्थित न तपासता ज्या पद्धतीने लेख बातम्या छापल्या जातात त्या पाहून व्यथित व्हायला होते. काही काळा पूर्वी लोकप्रभात “केटी मानसिकता” या विषयावर एक लेख वाचला होता. हल्ली वृत्तपत्र मासिके आदींमध्ये लेखा लेखात आढळणारे मुद्रण दोष, अपूर्ण माहितीच्या आधारे बातम्या ठोकून देण्याच्या प्रवृत्तीला तरी वेगळे काय म्हणावे?

अर्थात समाजाच्या प्रत्येक पैलूत उत्तमातल्या उत्तम गोष्टीची अपेक्षा लोक करतात पण स्वत:च्या वागण्यात, कार्यशैलीत मात्र अत्यंत भोंगळ पणा असतो हा विरोधाभास कसा समजावता येईल?
हि मानसिकता दिवसेंदिवस ज्या पद्धतीने बळावते आहे त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत त्या बद्दल पुन्हा कधीतरी…

उन्मादाकडून उन्मादाकडे – अर्थात फसवणुकीतून फसवणुकीकडे (स्वत:च्या)

In Uncategorized on August 18, 2011 at 2:40 pm

अण्णांच्या “दुसर्या” (म्हणजे अण्णांनी पाच महिन्यात दुसर्यांदा केलेल्या) लढ्याच्या(??) पार्श्वभूमीवर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी वृत्तपत्रांनी आपल्या अग्रलेखां  मधून समाजाला वास्तवाचा आरसा दाखवायचा प्रयत्न केला परंतु नेटकरांनी आणी फेसबुक योद्ध्यांनी या संपादकांना आपल्या प्रतिक्रियांनी झोडपून काढले, या संपादकांच्या समतोल विश्लेषणांना दुषणे दिली त्या प्रतिक्रिया मला नवीन नाहीत कारण एप्रिल च्या “लढ्याच्या” वेळेस मी देखील समतोल स्वर लावला तेव्हा फेसबुक वर बर्याच तीव्र प्रतिक्रिया (माझ्याच ओळखीच्यांकडून) मिळाल्या तरी पुन्हा एक प्रयत्न -

दुर्दैवाने स्वातंत्र्यपूर्व काळात देखील आधी समाजमन प्रगल्भ करू, साहेबाच्या काठीने अंध:श्रद्धा, जुनाट दुष्ट रूढी, जातीभेद आदींचे निर्मुलन करुया, आपले घर स्वच्छ करून घेऊया आणि समाज स्वातंत्र्य मिळवण्या इतपत प्रगल्भ झाला कि ब्रिटिशांना देश सोडण्या वाचून पर्याय रहाणार नाही हे सांगणाऱ्या समाजसुधारकांची आणी नेमस्त नेत्यांची जहाल नेत्यांनी मुस्काटदाबीच केली. आधी परकीयांना घालवू आणी मग यथावकाश आपले घर स्वच्छ करू म्हणणारे (ज्यात दुर्दैवाने बापू पण होते ) सत्तेचा सोपान चढले आणी मग स्वच्छतेच्या गप्पा विसरून गेले (बापूंना तर माथेफिरुंनीच संपवले) आणी मग उरला फक्त समाजाला एका उन्मादापासून दुसर्या उन्मादापर्यंत नेण्याचा खेळ.  उन्माद अवस्थेतून जागृत अवस्थेत आणणारे समाजसुधारक फारसे शिल्लक नाहीत स्वातंत्र्या पूर्वीच ज्योतिबा, सावित्रीबाई  फुले, भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे यांच्या सारख्या प्रवृत्तीना शेण-गोट्याचा मार देऊन संपवले होते, त्यामुळे समाजाला त्यांच्यातले दोष दाखवून सत्य असेल ते सांगणार आणी स्पष्ट ते बोलणार हि वृत्तीच लोप पावली आणी कोणी ती तशी दाखवलीच तर झुंड शाहीतून तिला देखील ठेचण्यात. आता उरलाय फक्त उन्माद, पावलोपावली आपल्याच लोकशाहीने सांगितलेली मुल्ये पायदळी तुडवायची, लोकशाही कायद्यांचे पालन करायचे नाही आणी लोकशाहीचा र्हास होतोय , सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे अश्या बोंबा मारताना आपण पावलो पावली या ना त्या रुपात लाच द्यायची वा घ्यायची. आज ज्या सरकारच्या, नोकरशाहीच्या नावाने उन्माद अवस्थेतले लोक खडे फोड्ताहेत त्या सरकार निवडले आपणच त्या नोकरशाहीत आपले सगे सोयरे काम करतात, कायदा हवा पण तो इतरांसाठी, माझे, माझ्या परिवाराचे काम ओळखीने झाले पाहिजे, पोलीस, नेते, सरकारी अधिकारी शुद्ध चारित्र्याचे हवेत, पण सिग्नल तोडला, गाडीने कुणाला उडवले, पोरं रेव्ह पार्टीत सापडली तर पोलीस, राजकीय नेते यांना फोन करून “तोड” देखील करायची,  स्वच्छ रस्ते हवेत , पण ठीक ठिकाणी घाण करताना काहीच वाटत नाही, सार्वजनिक शिस्त हि केवळ इतरांनी पाळावी  हि आपल्या वागण्यातील विसंगती या उन्मादातील झुन्डीला दाखवणार कोण व कधी.  दुर्दैवाने अश्या झुन्डीवर स्वार होण्यासाठी, अण्णा, बाबा, साहेब, बाईसाहेब, दादा काका टपलेलेच असतात, दोन दिवस बाबांचे, दोन दिवस साहेब वा बाईसाहेबांचे, आणी सध्या दोन दिवस अण्णांचे.

अण्णांच्या “पहिल्या” स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस वरील वरील ब्लॉग  प्रमाणेच विचार  माझ्या फेसबुक प्रोफाईल वर टाकले होते, एकजात सगळ्यांनी झोडपून काढले, निराशावादी चे लेबल लावले, तेव्हाच लक्षात आले, जसा आपला समाज तसेच आपले नेतृत्व ते तरी वेगळे कसे असेल??

ऑफ्रा विन्फ्रे च्या निमित्ताने

In Uncategorized on May 27, 2011 at 5:29 pm

आजच्या लोकसत्तात ऑफ्रा विन्फ्रे हिच्या शेवटच्या शो च्या निमित्ताने अग्रलेख आला आहे. त्या निमित्ताने मनात आलेले काही विचार-

समाजातील व्यक्ती निरीक्षणक्षम आणी अंतर्मुख होऊन विचार करणाऱ्या नसतात, ८०-९० टक्के लोकांचे व्यक्तिमत्व हे उथळ गोष्टीवरून मत बनवणारे असते म्हणून या टॉक शो चे फावते (ढोंगी बाबा बुवा माता यांचे फावते काहीसे तसेच). माणसांनी जर स्वत:ला सखोल विचार करावयाचे आणी अंतर्मुख होवून विचार करायचे वळण लावले (जे थोड्या प्रयत्नाने शक्य आहे). पण दुर्दैवाने इतकी इच्छा शक्ती कुणाकडे आहे (कारण मात्र वेळ कुणा कडे आहे असा दिला जातो) आणी या अश्या आतून पोकळ (आणी म्हणून विविध न्यूनगंडा/ भयगंडानी ग्रासलेल्या) लोकांमुळे टॉक शोज चे टीआरपी नेहमी वर असतात. टॉक शो मध्ये एक गुण असतो तो म्हणजे पायात बूट नसलेल्या व्यक्तीस लंगड्या व्यक्तीचे दर्शन घडवून ‘आपण किती भाग्यवान आहोत’ याची जाणीव करून देणे . वपुंच्या ‘तुम्ही भाग्यवान आहात’ या कथे प्रमाणे काहीसे. पण मानवी मनाचा मनोव्यापार काहीसा असा आहे की या टॉक शोज चे ८०-८५ टक्के दर्शक कार्यक्रम संपल्यावर पुढील १/२ -१ तास भारावलेल्या अवस्थेत असतात ( म्हणजे पिडीत व्यक्तीच्या ठिकाणी स्वत:ला पाहणे आणी नाडणाऱ्या व्यक्ती च्या ठिकाणी इतरांना) आणि थोडा बहुत इतरांशी सह्रद व्यवहार (आपल्या स्वार्थाला धक्का पोहोचत नाही तोवर) करणार आणी कार्यक्रमाचा ज्वर उतरला की पुन्हा येरे माझ्या मागल्या.

दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये हे खरे. कधी ती ऑफ्रा असते, कधी सत्यसाईबाबा, कधी राजकीय नेते, कधी अण्णा हजारे तर कधी  “बाई(साहेब) तुम्ही सगळ्यांचा विचार करता, पण कोणी तुमचा विचार करीत नाही” या वाक्याने मनाचा ताबा घेणारे कुडमुडे ज्योतिषी…

Follow

Get every new post delivered to your Inbox.